कोण म्हणते प्रेमामध्ये भाषेची गरज असते,
दोन मनांचे मिलन आणि हृदयाची साथ असते,
रंगभेद, जातीभेद प्रेमामध्ये कधीच बघितला जात नाही,
दोन हृदयांना जोड़णारी फ़क्त भावनेची तार असते . . .
अशीच एक परी एकदा आली माझ्या जीवनात,
दरी होती फार मोठी, पण काही ओढ़ होती मनात,
घडले कसे हे सारे, जे स्वप्नांप्रमाणे भासत होते,
पण स्वप्नचं जणू सत्यात, उतरू पाहत होते . . .
आली कल्पना मनात, बघावे तिला विचारून,
असले स्वप्न जरी मृगजळाप्रमाणे, तरी पहावे ते साकारून,
मी बोलण्याची जणू ती वाटच पाहत होती,
असे साकारले माझे स्वप्न, जणू ती माझ्यासाठीच होती . . .
तो तिचा सहवास आणि ती वेळ करामती होती,
हळू हळू नियतीच्या विरोधात ती नाती गुंफत होती,
आज न उद्या वेगळे होणार, हे दोघांनाही माहीतच होते,
पण असलेला क्षण हा आपलाच, हि त्या प्रेमाची शपथ होती . . .
आज कितीही लांब असलो तरी ती भावना तशीच आहे,
तिचा तो सहवास आणि तिची ती आठवण तशीच मनात आहे,
असेच हे स्वप्नं होते माझे, जे सत्यात उतरले होते,
काही दिवसांसाठी का असेना, पण ते मृगजळ माझे होते . . .
- दीपक पारधे
(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/)