Friday 22 June 2012

मन . . .


मन . . .

काय असते मनात, कधी कधी कळतंच नाही,
चंचल मन एका फांदीवर, कधी बसतंच नाही,
कुठल्याही गोष्टीने समाधानी, ते कधी होतंच नाही,
अपेक्षांनी भरलेली घागर, कधी सुकी राहतच नाही.

असे हे मन . . . मित्रांनो हा माझा पहिलाच लेख आहे, आजवर मी माझ्या भावना फक्त कवितांमधुनच मांडत आलो, पण आज असे वाटते आहे कि, ज्या विषयावर मी लिहणार आहे, तो विषय चार पंक्तींमध्ये मांडता येणारच नाही. तर वरील चार ओळी वाचून आता पर्यंत तुम्हाला कळलेच असेल कि मी कुठल्या विषया संदर्भात बोलत आहे. तर तो विषय आहे " मन "

तुम्हाला वाटतं का हो, "मन" हा शब्द जितका छोटा आहे, तितकाच त्याचा गाभा पण छोटा आहे, नाही ना! . . .  असे कमीच लोक असतील ज्यांना असे वाटत असेल. मला वाटते आपण मन हे नावच छोटे ठेवले आहे, नाव कसे वजनदार, बहारदार, दमदार, काहीतरी भरीव असे असायला हवे होते, पण जेसे शेक्सपिअर साहेब म्हणाले कि " नावात काय आहे " त्याप्रमाणे आपणही ते सोडूनच पुढे बोलू. तर आपला विषय होता मन. मन म्हणजे आपल्या सोप्प्या भाषेत आपले हृदय  बरोबर ना!!!
पण परत एक गोष्ट खटकते, जर आपले शरीर आपल्या मेंदूने चालते तर मग जेव्हा मनाचा प्रश्न येतो, तेव्हा तो मेंदू हृदयात येवून बसतो का हो
काही लोकांच्या मते बसतही असेल आणि काही लोकांच्या मतेतर मेंदू आणि मन (हृदय) हे रावण आणि त्याचा भाऊ विभिषनासारखेच आहे, सिनेमात तर यावरून अनेक वाक्य प्रसिद्ध आहेत, जसे " में अपने दिमाग कि नहीं, हमेशा अपने दिल कि सुनता हुं ". . . पण ते राहिले सिनेमापुरतेच. पण मला असा प्रश्न पडतो कि, नेमके मन म्हणजे काय मेंदूमध्ये चाललेला गोंधळच ना! . . . माझे तरी हेच मत आहे, होय गोंधळच.   डॉक्टर, वकील, पोलीस ह्यांचा तर मनाशी सहसा संबंध येतंच नाही, त्यांच्या मेंदुवरच त्यांचे क्षेत्र आणि त्यांचे कार्य चालू असते आणि शिक्षक, लेखक - कवी, चित्रकार ह्यांचा जास्तीत जास्त संबंध मनाशी असतो, कारण त्यांची विचार करण्याची पद्धत तशी भावूक आहे.  पण जर पूर्ण शरीर एकाच गोष्टीने चालते, तर मग त्या गोष्टीला दोन विभिन्न नावे देवून वेगळं का करण्यात आले आहे
ह्यालाही आपण मनाचा अथवा मेंदूचा एक गोंधळच म्हणूया. 
कारण मन म्हणजे काही वेगळे अवयव नसून मेंदूच्या एका कोपऱ्यात चालू असलेला भावनांचा खेळ आणि त्या मेंदूचे कार्य अथवा त्या मनुष्याचे कार्य त्याच्या भावनांवर अवलंबून असते. तुम्हीच बघा ना, जर एखाद्या मुलाने चांगले वर्तन केले तर आपण लगेच कसे बोलतो कि, मुलाला चांगले संस्कार दिले आहेत, बरोबर ना, तसेच हे. म्हणजे जी लोकं अत्यंत भावनिक आहेत, ती लोकं मनाने निर्णय घेतात आणि जी लोकं कमी भावनिक अथवा कठोर व स्वार्थी वृत्तीचे आहेत, ते मेंदूने निर्णय घेतात.
यातून काढायचे तात्पर्य एवढेच कि आपले वर्तन आपण लावून घेतलेल्या सवईंवर अथवा विचारांवर अवलंबून असते. त्यात कुठल्याही प्रकारचे विभाजन नसते. प्रत्येकजनाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्या वेगवेगळेपणा मुळेच माणसाची वेगवेगळी ओळख निर्माण होते. म्हणून मला नेहमी वाटते कि जर लहानपणापासूनच आपल्या मेंदूवर जर चांगल्या विचारांचा प्रहार झाला तरच आपण पुढे जावून संसारातील सगळी सुखे भोगू शकतो. अहो कित्येक लोकांना मी पाहतो, जे नेहमी दुसऱ्यावर कुरघोडी करणे, दुसऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे यातच समाधानी मानतात. काहीजन तर स्वार्थामध्ये सामाजिक व कौटुंबिक सुखापासून देखील वंचित राहतात. त्यांना भानच नसते कि ते काय करत आहे, स्वार्थहितामध्ये ती लोक अगदी आंधळी होतात. अहो असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूस घडतंच असतात. असाच माझ्या एका चांगला परीचयातला किस्सा मी तुम्हांस सांगू इच्छितो,
एक माझ्या चांगल्याच परिचयाचे नवरा बायकोचे जोडपे आहे, त्यांचा आणि माझा परिचय कसा हे सांगणे तितकेसे महत्वाचे नाहीये पण ते दोघेही माझ्या नेहमीच्या संपर्कातले म्हणून हि गोष्ट मला समजली.
तर गोष्ट अशी आहे कि, दोघांचाही हा दुसरा विवाह. दोघांनाही पहिल्या विवाहामधून मुले आहेत. पण आपणास आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी साथीदार हवा, बहुतांश ह्याच विचारातून त्यांनी लग्न केली असावीत. पण सध्या स्तिथी अशी आहे कि, त्या दोघांचे एकमेकांबरोबर जराही पटत नाही आणि त्याचे कारण ही तितकेच गमतीदार आहे. ते असे, हे दोघे एक साथीदार असावा म्हणून एकत्र आले आणि आज त्यांचे एकमेकांकडून एवढ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत अथवा असे म्हणू कि स्वार्थ निर्माण झाला आहे. आज प्रत्येक गोष्टीवरून ते भांडत असतात तरीही ते एका स्वार्थी भावनेतूनच. कारण त्या व्यक्तीस त्याच्या निवृत्ती पर्यंत त्याचे घर सांभाळणारी स्त्री हवी आहे म्हणून आणि त्या स्त्रीला त्या व्यक्तीच्या निर्वृत्तीनंतर मिळणारा पैसा हवा आहे म्हणून, तर तुम्हीच सांगा, आज ह्याला आपण संसार म्हणू शकतो का? ज्या ठिकाणी एकमेकांसाठी प्रेम तर सोडा पण आपुलकीची भावना देखील नाहीये आणि ते तसे सुधारवण्याचा देखील प्रयत्न करत नाहीयेत, तर काय म्हणावे त्यांच्या मनाला.... 
तर मित्रांनो असे हे मन, कोण कधी काय विचार करेल, कोण कधी कसे वागेल ह्याचा काही नियम नाहीये. अहो, ह्या जगात असेही लोक आहेत जे स्वताचा विचार करण्या अगोदर नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करतात. आणि हो, असे पहायला गेले तर दुसऱ्याला मिळवून दिलेल्या सुखात जो आनंद दडलेला असतो तो स्वतःला मिळालेल्या सुखातही नसतो आणि तोच खरा आनंद असतो. कारण आपण जन्माला येतो, त्यानंतर पुढचे आयुष्य घालवण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी काही गोष्टी करणे भागच आहे, पण त्यातूनही वेळ काढून जर आपण कोणासाठी काही करू शकलो, तर ह्या जगात येवून आपण केलेले स्वर्वत मोठे कार्य तेच असेल आणि असे कार्य करायला आपण नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. त्यालाच आपण जगणे असे बोलू शकतो.

मित्रांनो ह्या लेखामधून मला एवढेच स्पष्ट करायचे होते कि, आपले मन (मेंदू) जे आहे ते पाण्यासारखे आहे, ज्यात मिसळेल त्याला त्यांचा रंग व आकार येईल आणि त्या आकारावरच ठरेल कि तो मेंदू आहे के मन. 
त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या मनाला अथवा मेंदूला जितके ताब्यात ठेवू त्यावरच आपल्या वाट्याला सुख येईल आणि जर त्यावरचा ताबा सुटला तर वाट्याला फक्त वाद, तंटा, क्लेश, मनस्ताप ह्या सारख्याच गोष्टी येतील. तर आपणच ठरवले पाहिजे कि आपले जीवन कसे असावे सुखमय वा खडतर . . .  निर्णय शेवटी आपलाच.

धन्यवाद!!!

- दीपक पारधे 


No comments:

Post a Comment