Thursday 12 September 2013

मी जोकर आहे . . .



मी जोकर आहे,
मला हसायचय,
मनातील दुःख लपवुन,
जगाला हसवायचय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

जन्मताच आले दुःख वाट्याला,
गुलाबाचा मोह जणु काट्याला,
पण का तीथेच सडत बसायचय,
अरे मला तर सुगंधासह पसरायचय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

फुटकी पाटी नि अर्धी वही,
फाटलेले दुध त्याचेच दही,
उपासमार झाली जन्माची,
अरे मला तरीही शिकायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

तारुण्याईच्या वाटेवर प्रेमाची सावली,
फुटक्या नशिबाला खेळण्यातली बाहुली,
प्रेम नाही मिळाले म्हणून थोडी रूसायचंय,
अरे प्रेमाचं पाखरू तर जगभर पसरवायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

आयुष्याच्या गाडीला साथ चाकाची,
जोडीला जोड अजून एका नावाची,
माझ्या दुःखात तीला का राबवायचंय,
अरे तिचं दुःख तर मलाच सोसायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

हसता हसता आली वेळ सरपणाची,
तीरडीवरच संपेल शर्यत माझ्या जीवनाची,
मेल्यानंतरही तुम्हांला नाही रडवायचंय,
अरे माझ्या आठवणींनी तर फक्त तुम्हांला हसवायचंय,
कारण मी जोकर आहे,
मेलो तर काय झालं, मला फक्त हसायचय . . .
मला फक्त हसायचय  . . . 

- दीपक पारधे

Wednesday 29 May 2013

बघ पावसा . . .



बघ पावसा . . .
तुला पडता येईल का ?
डोळ्यातलं पाणी आमच्या पुसता येईल का ?
बघ पावसा . . .

अरे तहानलाय तो गावकरी,
त्याला पाणी देता येईल का ?
थकलेल्या त्या पायांना,
आता विसावा देता येईल का ?
अरे नाचतील ते सगळा थकवा विसरून,
पण सांग तुला पडता येईल का ?
बघ पावसा . . .

मरणाऱ्या त्या शेतकऱ्याला,
तुला वाचवता येईल का ?
सुकलेल्या त्या शेतांमध्ये,
तुला नाचता येईल का ?
अरे पिकवतील ते सोनं तीथे,
पण सांग तुला पडता येईल का ?
बघ पावसा . . .

अरे रुसलास असा तर सांग ना,
आम्हांला जगता येईल का ?
अरे तुझ्याविना आम्हांला कधी,
हसता येईल का ?
सुकुनगेली गेली जर फुलं सगळी,
तर त्यांना परत फुलवता येईल का ?
बघ पावसा . . .

निसर्गाचे महत्व सगळ्यांना,
पटवता येईल का ?
तुझ्या जाण्याचे कारण यातून,
सांगता येईल का ?
व्यथा तुझी मित्रांना माझ्या,
समजता येईल का ?
आणि तू  ही सांग तुला हे विसरून,
मनसोक्त पडता येईल का ?
त्यातच हरवलेल्या आठवणीं सोबत,
भिजवता येईल का ?
म्हणूनच म्हणतो बघ पावसा . . .
तुला पडता येईल का ? ? ?

- दीपक पारधे