Thursday 12 September 2013

मी जोकर आहे . . .



मी जोकर आहे,
मला हसायचय,
मनातील दुःख लपवुन,
जगाला हसवायचय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

जन्मताच आले दुःख वाट्याला,
गुलाबाचा मोह जणु काट्याला,
पण का तीथेच सडत बसायचय,
अरे मला तर सुगंधासह पसरायचय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

फुटकी पाटी नि अर्धी वही,
फाटलेले दुध त्याचेच दही,
उपासमार झाली जन्माची,
अरे मला तरीही शिकायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

तारुण्याईच्या वाटेवर प्रेमाची सावली,
फुटक्या नशिबाला खेळण्यातली बाहुली,
प्रेम नाही मिळाले म्हणून थोडी रूसायचंय,
अरे प्रेमाचं पाखरू तर जगभर पसरवायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

आयुष्याच्या गाडीला साथ चाकाची,
जोडीला जोड अजून एका नावाची,
माझ्या दुःखात तीला का राबवायचंय,
अरे तिचं दुःख तर मलाच सोसायचंय,
मी जोकर आहे,
मला फक्त हसायचय . . .

हसता हसता आली वेळ सरपणाची,
तीरडीवरच संपेल शर्यत माझ्या जीवनाची,
मेल्यानंतरही तुम्हांला नाही रडवायचंय,
अरे माझ्या आठवणींनी तर फक्त तुम्हांला हसवायचंय,
कारण मी जोकर आहे,
मेलो तर काय झालं, मला फक्त हसायचय . . .
मला फक्त हसायचय  . . . 

- दीपक पारधे

No comments:

Post a Comment