Monday 10 September 2012

आभाळीच्या पाखरा . . .



हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .
दाटलंया आभाळ, तू धाव जरा घे,
रानातूनी पळता, इसावा जरा घे,
हे मोडलंया घर तुझं, मनी भ्याव तुझ्या रे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . . 

दाटता आभाळ, माह्या उर कसा पेटला,
आठवणी पुरात गेल्या, संसार माह्या मोडला,
रानराण भटकत, वाघ शेळ्यात हा झोपला,
पडता कहर तुझा, पूर भिंतीतुनी नाचला,
कपाळाच्या नशिबाला, साथ तुझी दे . . . 
मोडक्या ह्या घराला, हाक तुझी दे . . .
हे उभा राहील संसार तुझा, दे छाप तुझी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

मोडक्या घराला पाहता, ताठला ह्यो बाणा,
संसारासी उभा ठाकला, ताठ माह्या कणा,
पाऊस गेला सुकून परी, पाणी डोळ्यामंदी राहिलं,
थाटून संसार नवा, देवा फुल तुझं वाहिलं,
जात तुझी नांगराची, औत हाती घे . . .
करुनिया पेरणी, आलंय पिक नव हे . . .
हे सपान व्हत जुनं, आता पहाट मोठी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

माय माझी धरणी, न बाप हा आभाळ,
उभारलंया समदं, जरी फाटकं कपाळ,
झेप घेतली पाखराची, न भुईस हा भार,
मोडक्यातून उभं राहिलं, देवा तुझाच आधार,
 करणी तशी भरणी, हि जाण मनी घे . . .
मोडलेल्या जगास, हाक तुझी दे . . .
हे जिद्दीच्या ह्या शिकवणीच, तू पाठ जगी दे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

- दीपक पारधे 

Friday 7 September 2012

अपेक्षांच्या सरी . . .




लिहतोय काहीतरी असे,
जे सगळ्यांच्या मनाला भिडेल,
मांडून मनाची व्यथा,
जो अर्थ सगळ्यांना पटेल . . .

कधी सुखाचा डोंगर,
तर कधी दुःखाची दरी,
पाणावलेल्या मनावर,
अपेक्षांच्या सरी . . . 

असा हा पाऊस अपेक्षांचा,
नेहमी दुसऱ्यालाच भिजवतो,
मोडताच कुठलीही अपेक्षा,
वाऱ्याविजांसह कडाडतो . . . 

हीच विजेची ठिणगी,
जेव्हा पडते नात्यांच्या झाडावर,
विखुरलेल्या मनांची व्यथा,
येवून संपते या झाडाच्या राखेवर . . .

असे का होते नात्यात,
जेव्हा बंध सहज तुटते,
शपथासह बांधलेल्या नात्याला,
एक ठिणगी येवून संपवते . . .

प्रश्न हा देखील मनाचाच,
मनासच विचारत आहे,
दिवसेंदिवस अपेक्षेपोटी,
नात्यांची गोडवी कमी होत आहे . . .

अशा अपेक्षांची आस,
मी केव्हाच सोडली आहे,
म्हणून माझ्या शब्दांच्या ओळीतून बहरलेली,
नाती मी जोडली आहे . . . 

तरीही त्रास होतो यांचा मला,
कारण प्रियजनांची अपेक्षा जिवंत आहे,
कितीही प्रयत्न केला दूर जाण्याचा तरी,
मनाच्या ह्या अनोख्या खेळत, मी सुद्धा भरडत आहे . . .  
मी सुद्धा भरडत आहे . . . 

- दीपक पारधे