Monday, 10 September 2012

आभाळीच्या पाखरा . . .



हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .
दाटलंया आभाळ, तू धाव जरा घे,
रानातूनी पळता, इसावा जरा घे,
हे मोडलंया घर तुझं, मनी भ्याव तुझ्या रे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . . 

दाटता आभाळ, माह्या उर कसा पेटला,
आठवणी पुरात गेल्या, संसार माह्या मोडला,
रानराण भटकत, वाघ शेळ्यात हा झोपला,
पडता कहर तुझा, पूर भिंतीतुनी नाचला,
कपाळाच्या नशिबाला, साथ तुझी दे . . . 
मोडक्या ह्या घराला, हाक तुझी दे . . .
हे उभा राहील संसार तुझा, दे छाप तुझी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

मोडक्या घराला पाहता, ताठला ह्यो बाणा,
संसारासी उभा ठाकला, ताठ माह्या कणा,
पाऊस गेला सुकून परी, पाणी डोळ्यामंदी राहिलं,
थाटून संसार नवा, देवा फुल तुझं वाहिलं,
जात तुझी नांगराची, औत हाती घे . . .
करुनिया पेरणी, आलंय पिक नव हे . . .
हे सपान व्हत जुनं, आता पहाट मोठी रे . . . 
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

माय माझी धरणी, न बाप हा आभाळ,
उभारलंया समदं, जरी फाटकं कपाळ,
झेप घेतली पाखराची, न भुईस हा भार,
मोडक्यातून उभं राहिलं, देवा तुझाच आधार,
 करणी तशी भरणी, हि जाण मनी घे . . .
मोडलेल्या जगास, हाक तुझी दे . . .
हे जिद्दीच्या ह्या शिकवणीच, तू पाठ जगी दे . . .
हे आभाळीच्या पाखरा, लय उंच तुझी झेप रं . . .
पावसाची सर येता, घराकडं खेप रं . . .

- दीपक पारधे 

No comments:

Post a Comment