Thursday, 14 June 2012

लहानगे व्हावेसे वाटते . . .



चिंग्या ते टिंग्या, बालपणीचा प्रवास,
छोटी चड्डी, लांब शर्ट, मित्रांचा सहवास,
कब्बडी ते क्रिकेट, मैदानातले डाव,
खेळून थकल्यावर, थंड गोळा आणि वडा पाव,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

घरासमोर अंगणात, नुसता आमचाच कल्लोळ,
रोज कोणाचे तरी भांडण, अभ्यासाचा बट्ट्याबोळ,
आई - बाबांबरोबर बाजारात जायला, एका पायावर तयार,
आणताच नवीन खेळणे, व्हायचा त्यावर प्रहार,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

शाळेत ह्या बाकावरून त्या बाकावर, केली मजाच जास्त,
ऐन परीक्षेच्या वेळेस, आम्हांस कॉपीच रास्त,
गणिताचा पेपर कधी, सुटायचाच नाही,
इंग्रजीच्या पेपरात मात्र काही, लिहायचेच नाही,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

केलेली मस्ती आणि मजा, खूप आठवते,
बालपणी गायलेले ते गीत, जणू कंठात दाटते,
नाही येणार परत ते दिवस, हे ठावूक आहे,
म्हणून तर त्या आठवणीत, मन माझे भावूक आहे,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

जबाबदारीच्या विळख्यात, ते बालपण कुठेतरी हरवले आहे,
स्वच्छंदी मनाला जणू, कैद केले आहे,
परत जगावे ते बालपण, हि इच्छा मात्र जिवंत आहे,
शाळेतल्या त्या बाकांवरून, अजूनही मन फिरते आहे,
असे ते बालपण आणि अश्या त्या आठवणींनी सतत मन दाटते,
म्हणूनच परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . .
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . .  .

- दीपक पारधे  

1 comment:

  1. HI THIS NICE THING GOOD BLESED YOU HI I AM GHANSHYAM VASANT SANAP ......................

    ReplyDelete