Friday, 29 June 2012

बोला पांडुरंग हरी . . .




विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

पंढरीच्या देवा तुझी कीर्ती मोठी ठावं रं,
बाळ गोपाळांसंगे नाचे रंक आणि रावं रं,
आलोया तुझ्या भेटीला, मुखात तुझं नावं रं,
प्रीतीच्या ह्या ओघात चाले, उठून सारा गावं रं,
दर्शनास आलो तुझ्या, जरी लांब ती पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

ज्ञानोबा माउली संत माझा तुकाराम,
नावं तुझे घेता देवा, दिसे मज कृष्ण अन राम,
नामात तुझ्या वेड्या झालो, नसे मज काही काम,
वैकुंठाचे सुख मिळे मज, घेता मुखी तुझे नाम,
कर्माचा या भोग मिळतो, फक्त तुझ्याच दारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

आषाढीच्या दिवशी जमे भक्तांचा मेळावा,
दर्शनास तुझ्या येती, मनी मायेचा ओलावा,
वारकरी संप्रदाय, धर्म असा पहावा,
जात धर्म मिसळती हवेत, फक्त प्रीतीचा सांगावा,
जयघोष करीत असे निघालो, काळजी नाही बरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

चंद्रभागा वाहती अशी जणू प्रेमाचा ओढा,
आंघोळ करिता चंद्रभागेत, मिटे पापाचा घडा,
कर्माची हि रास लागती, माणुसकीचा पाढा,
लहान थोर पीत इथे, तुझ्या  प्रीतीचाच काढा,
मानवतेचा धडा मिळतो, देवा अशी तुझी वारी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

माणुसकीचा नाश होतोय, पैशाच्या पोटी,
नाते सगळे वाहून जातात, जात यांची खोटी,
गोरगरीबांस सुख मिळो, हि एकची इच्छा माझी,
फक्त आशीर्वाद तुझा राहुदी, होईल कामना माझी पुरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . .

विठ्ठल विठ्ठल गजर जाहला, अवघी दुमदुमली पंढरी,
हात कढेवर, उभा विटेवर असा शोभे माझा हरी . . .
बोला पांडुरंग हरी . . . बोला पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . . 
पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .
पांडुरंग हरी . . . पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .पांडुरंग हरी . . .  

बोला पंढरीनाथ महाराज कि जय . . .  


- दीपक पारधे 

Sunday, 24 June 2012

एक पहाट . . .



एक पहाट अशी व्हावी प्रत्येकाच्या आयुष्यात,
माणुसकीची बीजे उगावीत प्रत्येकाच्या मनात,
त्या पहाटेची किरणे फक्त सुख घेवून येतील,
अपेक्षांच्या डोंगरावरून प्रेम राग पसरवतील . . . 

स्वार्थाच्या ह्या दुनियेमध्ये माणुसकी हरवली,
बनावटी चेहऱ्यामागे जात अशी मिरवली,
अपेक्षांच्या कहर झाला, मने अशी हि तुटली,
स्वार्थहितासाठी वेड्या मनास, गाठ कशी हि पडली . . . 

जात - धर्म इथे धुळीत मिळाले, वैमनस्य मनी असे वाढले,
पैश्याच्या ह्या लालचे पोटी, नाते गोते विसरू लागले,
जाण न कुणा अशी राहिली, नितीमत्ता इथे संपली,
स्वार्थी अश्या वातावरणात ह्या, माणुसकीची वाढ खुंटली . . .

एकच इच्छा मनी आहे, व्हावी अशी पहाट,
मने फुलवून निर्माण व्हावी, माणुसकीची वाट,
माणूस धर्म असा पसरावा, जशी सागराची लाट,
वाहून जावी सगळीच दु:खे, वहावा फक्त सुखाचाच पाट . . . 
वहावा फक्त सुखाचाच पाट . . . 

- दीपक पारधे 

Friday, 22 June 2012

मन . . .


मन . . .

काय असते मनात, कधी कधी कळतंच नाही,
चंचल मन एका फांदीवर, कधी बसतंच नाही,
कुठल्याही गोष्टीने समाधानी, ते कधी होतंच नाही,
अपेक्षांनी भरलेली घागर, कधी सुकी राहतच नाही.

असे हे मन . . . मित्रांनो हा माझा पहिलाच लेख आहे, आजवर मी माझ्या भावना फक्त कवितांमधुनच मांडत आलो, पण आज असे वाटते आहे कि, ज्या विषयावर मी लिहणार आहे, तो विषय चार पंक्तींमध्ये मांडता येणारच नाही. तर वरील चार ओळी वाचून आता पर्यंत तुम्हाला कळलेच असेल कि मी कुठल्या विषया संदर्भात बोलत आहे. तर तो विषय आहे " मन "

तुम्हाला वाटतं का हो, "मन" हा शब्द जितका छोटा आहे, तितकाच त्याचा गाभा पण छोटा आहे, नाही ना! . . .  असे कमीच लोक असतील ज्यांना असे वाटत असेल. मला वाटते आपण मन हे नावच छोटे ठेवले आहे, नाव कसे वजनदार, बहारदार, दमदार, काहीतरी भरीव असे असायला हवे होते, पण जेसे शेक्सपिअर साहेब म्हणाले कि " नावात काय आहे " त्याप्रमाणे आपणही ते सोडूनच पुढे बोलू. तर आपला विषय होता मन. मन म्हणजे आपल्या सोप्प्या भाषेत आपले हृदय  बरोबर ना!!!
पण परत एक गोष्ट खटकते, जर आपले शरीर आपल्या मेंदूने चालते तर मग जेव्हा मनाचा प्रश्न येतो, तेव्हा तो मेंदू हृदयात येवून बसतो का हो
काही लोकांच्या मते बसतही असेल आणि काही लोकांच्या मतेतर मेंदू आणि मन (हृदय) हे रावण आणि त्याचा भाऊ विभिषनासारखेच आहे, सिनेमात तर यावरून अनेक वाक्य प्रसिद्ध आहेत, जसे " में अपने दिमाग कि नहीं, हमेशा अपने दिल कि सुनता हुं ". . . पण ते राहिले सिनेमापुरतेच. पण मला असा प्रश्न पडतो कि, नेमके मन म्हणजे काय मेंदूमध्ये चाललेला गोंधळच ना! . . . माझे तरी हेच मत आहे, होय गोंधळच.   डॉक्टर, वकील, पोलीस ह्यांचा तर मनाशी सहसा संबंध येतंच नाही, त्यांच्या मेंदुवरच त्यांचे क्षेत्र आणि त्यांचे कार्य चालू असते आणि शिक्षक, लेखक - कवी, चित्रकार ह्यांचा जास्तीत जास्त संबंध मनाशी असतो, कारण त्यांची विचार करण्याची पद्धत तशी भावूक आहे.  पण जर पूर्ण शरीर एकाच गोष्टीने चालते, तर मग त्या गोष्टीला दोन विभिन्न नावे देवून वेगळं का करण्यात आले आहे
ह्यालाही आपण मनाचा अथवा मेंदूचा एक गोंधळच म्हणूया. 
कारण मन म्हणजे काही वेगळे अवयव नसून मेंदूच्या एका कोपऱ्यात चालू असलेला भावनांचा खेळ आणि त्या मेंदूचे कार्य अथवा त्या मनुष्याचे कार्य त्याच्या भावनांवर अवलंबून असते. तुम्हीच बघा ना, जर एखाद्या मुलाने चांगले वर्तन केले तर आपण लगेच कसे बोलतो कि, मुलाला चांगले संस्कार दिले आहेत, बरोबर ना, तसेच हे. म्हणजे जी लोकं अत्यंत भावनिक आहेत, ती लोकं मनाने निर्णय घेतात आणि जी लोकं कमी भावनिक अथवा कठोर व स्वार्थी वृत्तीचे आहेत, ते मेंदूने निर्णय घेतात.
यातून काढायचे तात्पर्य एवढेच कि आपले वर्तन आपण लावून घेतलेल्या सवईंवर अथवा विचारांवर अवलंबून असते. त्यात कुठल्याही प्रकारचे विभाजन नसते. प्रत्येकजनाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्या वेगवेगळेपणा मुळेच माणसाची वेगवेगळी ओळख निर्माण होते. म्हणून मला नेहमी वाटते कि जर लहानपणापासूनच आपल्या मेंदूवर जर चांगल्या विचारांचा प्रहार झाला तरच आपण पुढे जावून संसारातील सगळी सुखे भोगू शकतो. अहो कित्येक लोकांना मी पाहतो, जे नेहमी दुसऱ्यावर कुरघोडी करणे, दुसऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करणे यातच समाधानी मानतात. काहीजन तर स्वार्थामध्ये सामाजिक व कौटुंबिक सुखापासून देखील वंचित राहतात. त्यांना भानच नसते कि ते काय करत आहे, स्वार्थहितामध्ये ती लोक अगदी आंधळी होतात. अहो असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूस घडतंच असतात. असाच माझ्या एका चांगला परीचयातला किस्सा मी तुम्हांस सांगू इच्छितो,
एक माझ्या चांगल्याच परिचयाचे नवरा बायकोचे जोडपे आहे, त्यांचा आणि माझा परिचय कसा हे सांगणे तितकेसे महत्वाचे नाहीये पण ते दोघेही माझ्या नेहमीच्या संपर्कातले म्हणून हि गोष्ट मला समजली.
तर गोष्ट अशी आहे कि, दोघांचाही हा दुसरा विवाह. दोघांनाही पहिल्या विवाहामधून मुले आहेत. पण आपणास आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी साथीदार हवा, बहुतांश ह्याच विचारातून त्यांनी लग्न केली असावीत. पण सध्या स्तिथी अशी आहे कि, त्या दोघांचे एकमेकांबरोबर जराही पटत नाही आणि त्याचे कारण ही तितकेच गमतीदार आहे. ते असे, हे दोघे एक साथीदार असावा म्हणून एकत्र आले आणि आज त्यांचे एकमेकांकडून एवढ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत अथवा असे म्हणू कि स्वार्थ निर्माण झाला आहे. आज प्रत्येक गोष्टीवरून ते भांडत असतात तरीही ते एका स्वार्थी भावनेतूनच. कारण त्या व्यक्तीस त्याच्या निवृत्ती पर्यंत त्याचे घर सांभाळणारी स्त्री हवी आहे म्हणून आणि त्या स्त्रीला त्या व्यक्तीच्या निर्वृत्तीनंतर मिळणारा पैसा हवा आहे म्हणून, तर तुम्हीच सांगा, आज ह्याला आपण संसार म्हणू शकतो का? ज्या ठिकाणी एकमेकांसाठी प्रेम तर सोडा पण आपुलकीची भावना देखील नाहीये आणि ते तसे सुधारवण्याचा देखील प्रयत्न करत नाहीयेत, तर काय म्हणावे त्यांच्या मनाला.... 
तर मित्रांनो असे हे मन, कोण कधी काय विचार करेल, कोण कधी कसे वागेल ह्याचा काही नियम नाहीये. अहो, ह्या जगात असेही लोक आहेत जे स्वताचा विचार करण्या अगोदर नेहमी दुसऱ्याबद्दल विचार करतात. आणि हो, असे पहायला गेले तर दुसऱ्याला मिळवून दिलेल्या सुखात जो आनंद दडलेला असतो तो स्वतःला मिळालेल्या सुखातही नसतो आणि तोच खरा आनंद असतो. कारण आपण जन्माला येतो, त्यानंतर पुढचे आयुष्य घालवण्यासाठी आपल्याला आपल्यासाठी काही गोष्टी करणे भागच आहे, पण त्यातूनही वेळ काढून जर आपण कोणासाठी काही करू शकलो, तर ह्या जगात येवून आपण केलेले स्वर्वत मोठे कार्य तेच असेल आणि असे कार्य करायला आपण नेहमीच तत्पर राहिले पाहिजे. त्यालाच आपण जगणे असे बोलू शकतो.

मित्रांनो ह्या लेखामधून मला एवढेच स्पष्ट करायचे होते कि, आपले मन (मेंदू) जे आहे ते पाण्यासारखे आहे, ज्यात मिसळेल त्याला त्यांचा रंग व आकार येईल आणि त्या आकारावरच ठरेल कि तो मेंदू आहे के मन. 
त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या मनाला अथवा मेंदूला जितके ताब्यात ठेवू त्यावरच आपल्या वाट्याला सुख येईल आणि जर त्यावरचा ताबा सुटला तर वाट्याला फक्त वाद, तंटा, क्लेश, मनस्ताप ह्या सारख्याच गोष्टी येतील. तर आपणच ठरवले पाहिजे कि आपले जीवन कसे असावे सुखमय वा खडतर . . .  निर्णय शेवटी आपलाच.

धन्यवाद!!!

- दीपक पारधे 


Thursday, 14 June 2012

लहानगे व्हावेसे वाटते . . .



चिंग्या ते टिंग्या, बालपणीचा प्रवास,
छोटी चड्डी, लांब शर्ट, मित्रांचा सहवास,
कब्बडी ते क्रिकेट, मैदानातले डाव,
खेळून थकल्यावर, थंड गोळा आणि वडा पाव,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

घरासमोर अंगणात, नुसता आमचाच कल्लोळ,
रोज कोणाचे तरी भांडण, अभ्यासाचा बट्ट्याबोळ,
आई - बाबांबरोबर बाजारात जायला, एका पायावर तयार,
आणताच नवीन खेळणे, व्हायचा त्यावर प्रहार,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

शाळेत ह्या बाकावरून त्या बाकावर, केली मजाच जास्त,
ऐन परीक्षेच्या वेळेस, आम्हांस कॉपीच रास्त,
गणिताचा पेपर कधी, सुटायचाच नाही,
इंग्रजीच्या पेपरात मात्र काही, लिहायचेच नाही,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

केलेली मस्ती आणि मजा, खूप आठवते,
बालपणी गायलेले ते गीत, जणू कंठात दाटते,
नाही येणार परत ते दिवस, हे ठावूक आहे,
म्हणून तर त्या आठवणीत, मन माझे भावूक आहे,
असे ते बालपण, फार आठवते,
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . . 

जबाबदारीच्या विळख्यात, ते बालपण कुठेतरी हरवले आहे,
स्वच्छंदी मनाला जणू, कैद केले आहे,
परत जगावे ते बालपण, हि इच्छा मात्र जिवंत आहे,
शाळेतल्या त्या बाकांवरून, अजूनही मन फिरते आहे,
असे ते बालपण आणि अश्या त्या आठवणींनी सतत मन दाटते,
म्हणूनच परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . . .
परत फेरफटका मारून, लहानगे व्हावेसे वाटते . .  .

- दीपक पारधे  

Tuesday, 12 June 2012

घर . . .



घर . . . चार भिंतींमधील जागा,
कि छताखाली डोके लपवायला असलेला गाभा,
होते का हो यातून पूर्ण घर . . .

कुणाच्या घडलेल्या नशिबाचे सूत्र,
तर कुणासाठी छोट्या घरातून मोठ्या इमारतीचे चित्र,
स्वप्नं फार मोठी, काय खाली नि काय वर ,
होते का हो यातून पूर्ण घर . . . 

फुटपाथ वर मांडलेला संसार,
वा नशिबाला दोष देत पडलेला अंधार,
ऊन, वारा अन पावसासाठी त्यावर असलेले छप्पर,
होते का हो यातून पूर्ण घर . . . 

गरजेहून अधिक मोठा असलेला महल,
त्याच्याकडे पाहून दुसऱ्यांना वाटलेले कुतूहल,
ऐशो आरामाची दुनिया, नाही जमत सगळ्यांना याची सर,
होते का हो यातून पूर्ण घर . . . 

घर म्हणजे माणसांनी गजबजलेलं गाव असावं,
माणसांच्या मनात फक्त निर्मळ भावनेचं नाव असावं,
काय राजा नि काय रंक, तिथे सगळ समान वाटावं,
नात्यातील गोडव्याचं गीत असं गावं,
अशाच जागेला आपण घर म्हणावं,
जिथे सगळ्यांमध्ये आपलं मन रमावं . . . 

फक्त त्यालाच आपलं घर म्हणावं . . . 
फक्त त्यालाच आपलं घर म्हणावं . . .
आणि मगच परिपूर्ण असेल ते . . .  घर . . .   

- दिपक पारधे 

Friday, 8 June 2012

प्रेम आणि पाऊस . . .



प्रेम आणि पाऊस, जरा वेगळेच नाते,
प्रत्येक पावसात मन, अजूनही तिचेच गाणे गाते,
जसे पावसाच्या एका सरीने, सारी वृक्षवल्ली बहरते,
त्याच सरी बरोबर आजही तिच्या आठवणीने, प्रेमाची कळी फुलते,
असे तिचे ते प्रेम, अजूनही मनाला वेड लावते,
 तसेच पावसाची प्रत्येक सर, मनात काहूर माजवते,
आठवतोय मला, तिच्या चेहऱ्यावर पडलेला थेंब पावसाचा,
स्पर्श करताच तिला, मोती बनून भाग बनला माझ्या काळजाचा,
असे तिचे ते रूप आणि सौंदर्य, आजही आहे डोळ्यात साठलेले,
तिच्या स्पर्शासाठी जणू, नभात ढग दाटलेले,
असा पाऊसही जणू, तिचाच दिवाना होता,
त्या दिवाण्यांच्या यादीत, प्रथम क्रमांक मात्र माझाच होता,
पावसात फुललेले ते प्रेम, अगदी बहरले होते,
असे फुललेले फुल, सगळ्यांच्या नजरेने घेरले होते,
म्हणून संपताच तो पावसाळा, मिटल्या त्या साऱ्या खुणा,
पुढच्या पावसाळ्यात फक्त आठवणीच राहिल्या, हे न बोलवे कुणा,
असाच हा पावसाळा, कित्येक नाती बहरतो आहे,
पण माझ्यावर तो आजही, तिच्याच आठवणींचा वर्षाव करतो आहे . . . 
फक्त तिच्याच आठवणींचा वर्षाव करतो आहे . . .


- दीपक पारधे  

Tuesday, 5 June 2012

खेळ नशिबानं मांडला . . .



काय रं देवा खेळ ऐसां नशिबानं मांडला,
डोंबारयागत नाचायला, पाय न माझा थांबला,
तीळ तीळ मरत माझा, जीव ऐशिवर टांगला, 
कधी संपल भोग माझं, ईचार मनी दाटला 
काय रं देवा खेळ ऐसां नशिबानं मांडला . . . 

राब राब राबून कामात, संसार असा थाटला,
साथ न्हाय अशी कुणाची, न गडी म्हणून लाभला,
छाताडावर आभाळ घिवून, ऐश गड्याचा घेतला,
काय रं देवा खेळ ऐसां नशिबानं मांडला . . . 

दोन पणत्या नि एक दिवा, पोटी कसा लाभला,
शिक्ष्यान कराव लेकरांचं, ध्यास मनी लागला,
सुखाखातर मरून त्यांच्या, महल पत्यांचा बांधला,
काय रं देवा खेळ ऐसां नशिबानं मांडला . . . 

करून लगीन लेकीनच, संसार त्यांसी करवला,
कर्मदरिद्री नशिबाला, न जावई चांगला भेटला,
राख रांगोळी करून लेकीची, नातू पदरात सोडीला,
काय रं देवा खेळ ऐसां नशिबानं मांडला . . . 

समदं संपलं आता, पण एक सपान डोळ्यामंदी बांधलं,
लेकाच्या सुखाखातीर, अजूनही स्वतःस मी मारीलं,
सुखी ठेव देवा त्यास, हे वैभव त्यास वाहिलं,
असू दे जाणीव त्याच्या मनी, जे कष्ट मी भोगीलं,
मी अशीच आले अन अशीच जाईन,
फक्त जग खेळ नशिबाचा पाहिलं . . . 
काय रं देवा खेळ नशिबाचा पाहिलं . . .    

- दीपक पारधे 

Sunday, 3 June 2012

माणसातला माणूस कसा शोधावा . . .



ह्या जगण्यास अर्थ असा काय द्यावा,
स्वार्थाचा खेळ रोज इथे पाहावा,
कोण देईल का प्रश्नाचे उत्तर माझ्या,
माणसातला माणूस कसा शोधावा . . . 

हे जग असे हि भ्रमनगरी,
गुंतला इथे जो तो लहरी,
तहान भूक नसे त्यास प्रहरी,
काय ह्यास जीवनाचा सार म्हणावा,
माणसातला माणूस कसा शोधावा . . . 

पैसा पैसा वेड लागले,
नाते गोते तुटू लागले,
मदतीचे हि हात आखडले,
स्वार्थाचा असा दरबार भरावा,
माणसातला माणूस कसा शोधावा . . . 

भांडण, तंटा, क्लेष वाढले,
मान संस्कृती धुळीत मिळाले,
स्पृश्य अस्पृश्य फक्त भेद करावा,
मग संदेश यातून काय मिळावा,
माणसातला माणूस कसा शोधावा . . . 

शोध कार्य असे चालू आहे,
माणुसकीचे बीज ते आहे,
कर्तव्याचे झाड उगावे,
मानवतेचे फुल बहरावे,
थोर धर्म हा जगात पसरावा,
माणसात फक्त माणूस वसावा . . . 
माणसात फक्त माणूस वसावा . . . 

- दीपक पारधे